Vivek Sagdev

Pt Vilas Thuse 2

नेहमीप्रमाणे ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी घरी आलो…… घराजवळ येताच सवयीप्रमाणे गाडीतल्या गॅरेज डोअर ओपनरचं बटण दाबलं…. पण गॅरेजचं दार काही उघडलं नाही…. अगदी जवळ आल्यावर, गाडी थांबवून परत बटण दाबलं…. तरी दार उघडायला तयार नाही…. चडफडत गाडीचं दार उघडलं, खाली उतरलो, गाडीचं दार बंद केलं…… घराच्या दाराजवळ गेलो; तर लक्षात आलं की घराची किल्ली गाडीतच आहे…. शिव्या घालत (स्वतःला) परत गाडीजवळ आलो…. दार उघडलं, किल्ली काढली, दार लावलं. घराच्या दाराजवळ गेलो, किल्ली लावून घराच दार उघडलं, आत येऊन गॅरेजचं दार आतून उघडलं…. त्या उघडलेल्या दारातून बाहेर येऊन गाडीचं दार उघडून परत गाडीत बसून गाडी नीट गॅरेजमधे लावली……

हुSSSश!!! एक दार (gate) न उघडल्याने केवढी सव्यापसव्ये करावी लागली……

आजकालच्या झटपटयुगात, जिथं आपलं सारं जीवनच कॉम्प्युटर, स्मार्टफोन मधील विविध APPs, कारपासून ते GPS पर्यंत सर्वच ठिकाणी असलेले micro-controllers, यांनी व्यापलेलं असताना; या सर्वांच्या मुळाशी असलेल्या हजारो logic-gates पैकी एखाद्या दाराने असाच असहकार पुकारला तर?????

पण हे व्हायची शक्यता अगदी शून्याच्या जवळ आणून ठेवली आहे विवेक सगदेव यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाने…..

विवेक सगदेव…… अगदी, आजकालच्या भाषेत म्हणतात तसा, “हार्डकोअर” तंत्रज्ञ…… आपल्यापैकी बऱ्याच जणांप्रमाणे जन्म भारतात पुढे शालेय शिक्षण हडस हायस्कूल नागपूर. नंतर IIT (मुंबई) सारख्या नामवंत संस्थेतून B-Tech ची पदवी घेतल्यावर अमेरिकेत येउन पूर्ण केलेला पदव्युत्तर अभ्यासक्रम. त्यानंतर केलेल्या संशोधन कार्याविषयी बोलतांना विवेक सांगत होता – सुमारे तीस वर्षांपूर्वी मॅसॅच्युसेट्समधे काहीतरी अभिनव शोधण्याची धडपड करणारा कल्पक इंजिनिअर्सचा एक गट एकत्र आला आणि त्यांनी VLSI (Very-Large-Scale Integration) या वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रात संशोधन करायला सुरुवात केली VERILOG (stands for Verify Logic) नामक प्रणाली हे या संशोधनाचे फलित. आज ही प्रणाली industry standard मानली जाते. या ग्रुपबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो.

VERILOG अस्तित्वात येण्यापूर्वी लॉजिक गेट्सची बांधणी, आराखडा तयार करणे, त्याची प्रणाली विकसित करणे या व अशा अनेक गोष्टी खरोखर हाताने कराव्या लागत होत्या. त्यामुळे एका वेळी वापरात येणाऱ्या लॉजिक गेट्सच्या संख्येवर निर्बंध येत असे. विवेकच्याच शब्दात सांगायचं झालं तर – Prior to development of Verilog, Integrated Circuit chips were made with schematic drawings at gate level. The tedious process limited usage of gates to few thousand gates. With VERILOG, this leapfrogged. Expressive power of a programming language for hardware design; combined with dramatic decrease in transistor sizes with Moores Law, has brought in a digital revolution. Today; billions of transistors can easily fit onto a single chip, enabling high powered micro-processors and graphics units, amongst others…

हे तंत्रज्ञान पुढे Sun Micro Systems, Motorola अशा नामवंत कंपन्यांनी विकत घेऊन simulation, testing, programming अशा विविध अंगांनी पुढे विकसित केलं. या तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना शिकत असतानांच व्हावी या उद्देशाने विवेकने “Verilog” या पुस्तकाचे लेखन केले. या पुस्तकाच्या आतापर्यंत तीन आवृत्या प्रकाशितदेखील झाल्या आहेत व अंदाजे पंच्याहत्तर हजारावर विद्यार्थ्यांनी / अभियंत्यांनी वाचून याचा लाभ घेतला आहे

भारतात करीत असलेल्या सामाजिक कार्याविषयी विचारले असता विवेक, “मला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी मिळवायची नाहीये, प्रौढी मिरवायची नाहीये”…. , असं सांगत; काही बोलायलाच तयार नव्हता. अखेरीस जेव्हा “या माहितीचा उपयोग आजच्या तरुणाईला प्रेरणा, “रोल मॉडेल” म्हणून नक्कीच होऊ शकतो” हे जेव्हा मी पटवू शकलो तेव्हा; विवेक व त्याचा डॉक्टर भावाने स्वामी विवेकानंद मिशन (केरळ) ला करत असलेली मदत याविषयीची माहिती मिळाली. हे दोघं बंधू त्या संस्थेला आर्थिक मदत तर करतातच शिवाय स्वतः तिथे जाऊन कामंही करतात. याबरोबरच “एकल विद्यालय” च्या अंतर्गत येणाऱ्या आदिवासी मुलांच्या शिक्षण कार्यासाठी सुद्धा विवेक झटून मदत करत असतो.

आपल्या सामाजिक जबाबदारीचं कार्यक्षेत्र भारतापुरतच सीमित न ठेवता, अमेरिकेतही NextDoor संस्थेसोबत neighbourhood watch चा उपक्रम असो वा city council च्या निवडणुका असोत; सर्व ठिकाणी विवेकचा अगदी हिरीरीने सहभाग असतो. या व अशा उपक्रमांद्वारे Cupertino गावाच्या समाजजीवनात विवेक अगदी समरसून गेला आहे. याचबरोबर स्थानिक महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती लावत मराठी लोकांशीही संबंध जोडून ठेवलेले आहेत. BMM चे अधिवेशनसुद्धा विवेकसाठी नवीन गोष्ट नाही. यापूर्वीच्या बऱ्याच अधिवेशनाला विवेकने उपस्थिती लावली आहे.

विवेकला आगामी BMM २०१७ साठी उपस्थित रहाण्याचे आग्रहाचे निमंत्रण आमच्या टिमतर्फे देऊन तसेच त्याच्या आगामी पुस्तकासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देऊन मी विवेकचा निरोप घेतला.

शब्दांकन – संजय मेहेंदळे