Vilas thuse

Pt Vilas Thuse 2

एक हरहुन्नरी मनुष्य!

पुणे तिथे काय उणे? ७५ निरांजनांच्या ताटापासून (Spanish) ‘झारा’च्या स्कर्टापर्यंत सगळं मिळतं! मग अभियांत्रिकी शिक्षण घेउन अमेरिकेत स्थायिक झाल्यावर पौरोहित्य शिकणारा पंडित तिथे ‘पैदा’ झाला तर नवल नाही! त्याचं असं झालं…

श्री.विलास ठुसे मूळचे संगमनेरचे, परंतु शिक्षण पुण्याचे. पुणे, धरणगाव, प्रताप कॉलेज, कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे ही महाराष्ट्राशी दृढ नाते सांगणारी नावं (आणि गावं) उच्चारत संभाषणाला सुरुवात झाली. योग्य शिक्षण, मेहनत, नशीब याशिवाय यशस्वी होण्यासाठी एक वेगळाच गुण लागतो – आयुष्याकडे चाकोरीबाहेरून बघण्याचा. हा गुण त्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव आहे. भारतात असताना ते ‘अल्फ़ा लावल’ या कंपनीत नोकरीला होते. अल्फ़ा लावल कंपनी सोडल्यावर एके वर्षी कंपनीच्या सर्वेसर्वा सौ.पूनावाला (मिसेस लीला पूनावाला) या एम. डी. झाल्याचे त्यांना कळले. वाचनात त्याही कॉलेज ऑफ इंजिनियरिंग च्या विद्यार्थिनी होत्या हे आढळले. दिलखुलासपणे विलासजींनी त्यांना अभिनंदनपर आंतरदेशीय (आठवतात का?) पत्र पाठवले. निव्वळ कौतुक व शाबासकीची थाप! हे पाउल उचलणे हे धडाडीचे लक्षण आहे आणि व्यक्तीला मानण्याचेही. सौ. पूनावाला यांनी हा गुण हेरला. चुणचुणीत, अक्षर सुंदर, निस्पृह (क्लीन) आणि कामात टापटीपपणा यामुळे उमेदवारीच्या काळातही विलास अनेकांस परिचित होते, सौ. पूनावालानी या होतकरू तरुणाला सेल्स ह्या क्षेत्रात संधी द्यायचे ठरवले आणि नोकरीच्या निमित्ताने विलासचे महाराष्ट्राबाहेर पाऊल पडले.

वरवर पाहू गेलं तर तुमची-आमची आणि त्यांची गोष्ट सारखीच – अभियान्त्रिकी पेशा (मेकॅनिकल इंजिनीअर), शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने पुणे-नाशिक प्रवास, नोकरी MIDC (गावाच्या वेशीबाहेर!) आणि मग अमेरिकेत प्रयाण! गोष्ट वेगळ्या रस्त्याने जाऊ लागते ती अशी…याच प्रवासात ते “पंडित” झाले! तो ही एक किस्सा आहे! मेहुणा लग्नाच्या वयात आल्यावर पत्रिका पाहणे/देणे याला सुरुवात झाली. सासूबाईंचे म्हणणे पडले पत्रिका बघितल्या शिवाय लग्न करायचे नाही. पण फारशी योग्यता नसलेल्या ज्योतिष्याकडे पत्रिका दाखवली गेली तर “तो काय ठरवणार ?!” मग काय, विलास ठुसे यांनी पुन्हा चाकोरीबाहेर जाऊन स्वत:च ज्योतिष शास्त्र शिकवायचे ठरवले. हाती घेतलेले काम व्यवस्थित करायचे हा स्वभाव असल्याने, निव्वळ करून ते थांबले नाहीत; ज्योतिष विशारद व ज्योतिष शास्त्र दोन्हीच्या परीक्षा देखील दिल्या. (याच मेहुण्याने कालांतराने त्यांना अमेरिकेत आणले.)

त्यांचा व मुहूर्तांचा पूर्वीपासून संबंध असावा; १९८२ साली साखरपुडा अक्षयतृतीयेला आणि लग्न दसऱ्याला! व्यावसायिक जीवनात डाइरेक्टर, वाइस प्रेसीडेंट ही बिरुदावली मिळाली तशीच पंडिताची पगडी व पदवी देखील स्वकष्टाने मिळाली. पौरोहित्य हे केवळ जीवनमार्ग नसून व्यवसायही आहे. माझ्या माहितीत एक अजून अनुभवी व अभ्यासू पुरोहित इथे आहेत. त्यांच्याकडे मी विलास ठुसेंचा विषय काढला (एक पंडित दुसर्या पंडिताविषयी …) “हो मी ओळखतो. पूजा खूप चांगली सांगतात आणि संकेतस्थळ (वेबसाइटwww.panditjiusa.com) देखील अभ्यास करून बनवलं आहे.” म्हणजे या क्षेत्रातही त्यांच्या प्राविण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे!

“विलास ठुसे ना, हो मी ओळखतो त्यांना” असं लगेच समोरची व्यक्ती म्हणते. ते का याची प्रचीति बोलताना आली. त्यांची मुलाखत घ्यायला मी फोन केला होता परंतु, बोलण्याच्या ओघात त्यांनी माझी विचारपूस आस्थेने केली आणि एकदम लक्षात आलं की श्रीमती पूनावाला असोत नाहीतर कधीही न पाहिलेली MMD (Maharashtra Mandal Detroit) ची प्रतिनिधी असो, हा मनुष्य भेटलेल्या (आणि न भेटलेल्या) प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधू शकतो. बे एरिया त्यांना प्रेमाने विलासदा असे संबोधातो.

“तुमचा एवढा लोकसंग्रह कसा? तुम्ही एवढी लग्न/कार्य केलीत का?” मी विचारलं.
“नाही गं, एक कारण म्हणजे ओळखीच्या सर्वांना (फेसबुक वर असो व नसो!) मी कटाक्षाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आपल्या वाढदिवसाला कोणीतरी आठवण काढावी असं सर्वांना वाटतं…” WhatsApp च्या जमान्यात वैयक्तिक शुभेच्छा देणे हे दुर्मिळ!

स्नेह्शीलता घरी पाणी भरत असावी, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मेघाताई (पूर्वाश्रमीच्या मेघा गांधी – मराठीच!) या गेली १०-१२ वर्षं ‘बालवाडी’ (Daycare:www.kidsplanetusa.com) चालवत आहेत. म्हणजे तिथेही लोकसंग्रह. एकदा माया जडली की मुलांना मेघाताई सोडून दुसरीकडे जायला आवडत नाही, काही मुलं तर रोज २ तास प्रवास करून त्यांच्याकडे दिवसभरासाठी येतात. पूजा सांगणारे गुरुजी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक बैठी व्यक्ती येते – एकाच जागी बसून “हं, सोडा आचमन।” सांगणारी. त्या प्रतिमेला हे पंडित तडा देतात. हौस म्हणून हे सांस्कृतिक कार्यक्रमांचे छायाचित्रण व Videography देखील करतात – आवड म्हणून पण व्यावसायिक दर्जा ठेवून. पत्नीप्रमाणे दोन्ही मुलगे देखील ‘मम’ म्हणत कौटुंबिक जीवनात समरस झाले आहेत.

तर मंडळी, हा उत्साहाचा झरा कायम खळाळता राहो! ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

शब्दांकन – ज्योत्स्ना दिवाडकर (Jyotsna M. Diwadkar)