Subhash Gaytonde

subhashIt gives us great pleasure to introduce Shree. Subhash Gaitonde: an enterprising builder, avid BMM-goer, and an ardent devotee of classical music. He came to Seattle in 1970 to study architecture; a field less inhabited by immigrants even now. After working for nearly 20 years, he started his own building and developing business (www.cmcrealty.com). To quote his email signature ‘the harder he works, the luckier he gets….!’ Impressive as that is, what strikes you when you talk to him is his passion for Indian classical music. A passion that drove him to start vocal lessons from Pt. Vijay Koparkar at the age of 60! Each year, he spends a month in Pune, learning music ‘gurukul’ style. Back in the U.S.; he devotes early hours of the morning for riyaaz. Here is his journey, in his own words…

सिमेंटपासून संगीताकडे: श्री.सुभाष गायतोंडे

एक मराठी माणूस – विरोध व विनोद दोन्हीला न जुमानता – धंद्यात यशस्वी होऊ शकतो, तोही ‘गोऱ्यांच्या देशात’, यावर आपला (म्हणजे मराठी लोकांचा!) विश्वास बसायला वेळ लागतो. त्यातून तो उद्योजक गिरगावात वाढला, इथे येउन त्याने बांधकाम व्यवसायात स्वत:चे स्थान कमावले हे कळले की आपण थक्क होतो. श्री. सुभाष गायतोंडे यांचा जन्म १९४६ सालचा. घरची परिस्थिती बेताची आणि स्वातंत्र्योत्तर काळात ती सुधारण्याची शक्यता कमी होती. भारतात स्वातंत्र्य मिळालं याचा आनंद होता पण ‘पुढे काय’ हे मोठं प्रश्नचिन्ह होतं. थोड्याफार फरकाने बऱ्याच मध्यमवर्गीय तरुणांची स्थिती ‘रॉकेलसाठी रांगा, पुस्तकांना पैसे नाहीत, बसचे तिकीट परवडत नाही’ अशी होती. त्यांचे मामा त्या काळात अमेरिकेत उच्च शिक्षण घेउन स्थायिक झाले होते. मामांकडून गोष्टी ऐकून अमेरिकेविषयी उत्सुकता वाटत होती. सुबत्ता होतीच पण त्याहीपेक्षा शिक्षण आणि न्याय इथे आहे हे जाणवत होते. शेवटी सेठना व टाटा शिष्यवृत्ती, थोडेफार कर्ज यांचा आधार, महत्वाकांक्षा आणि अपार जिद्द या भांडवलावर ते १९७० साली सीएटल शहरात स्थापत्यविशारद (architect)व्हायला दाखल झाले .

त्या काळी स्थापत्य/वास्तुशास्त्र शिकायला अमेरिकेबाहेरचे विद्यार्थी कमी येत.

“पहिली काही वर्षं जड नाही का गेली तुम्हाला”? मी विचारले.
“अगं, जड काय – काही काही वेळा कात्रीत पकडल्यासारखे वाटायचे… एरवी Boeing कंपनीचे या राज्यावर साम्राज्य होते, रोजच्या वाहतुकीसाठी सुपर सॉनिक ट्रान्स्पोर्ट (SST) वापरायचं ठरत होतं, तो प्रकल्प कार्यरत झाला असता तर अनेकांची नोकरी व रोजगाराची सोय झाली असती… पण कॉंग्रेसने त्याला मोडता घातला आणि तो प्रकल्प व आजूबाजूची अर्थव्यवस्था कोलमडली. इथे राहिलो तर नोकरी नाही अन परत गेलो तर डोक्यावर कर्ज…आता काय करायचं या विचारात असताना अचानक फ्लॉरिडा राज्यात नोकरी करायची संधी चालून आली आणि मग मात्र मागे वळून पाहावं लागलं नाही.”

तिथली आव्हानं आणि अनुभव ऐकत मी त्यांच्याबरोबर सिमेंटच्या जंगलात घुसले! या क्षेत्रात देखील: स्थापत्यविशारद, विकासक, बांधकाम नियोजक आणि प्रबंधक अशी चतु:श्रेणी असते. (माझ्या ज्ञानात भर पडली!) या चारी भूमिका त्यांना हव्या होत्या. अपार मेहनत आणि शिकण्याची वृत्ती यामुळे यश मिळत गेले. तो काळ वेगळा होता भारतीयांची संख्या कमी आणि भारताविषयी ज्ञान कमी अशी इथे अवस्था होती. त्या परिस्थितीत इमारती बांधणे, सजवणे व विकणे या सारखा “थेट घरात घुसणारा” व्यवसाय करून यश मिळवणे कठीण असणार.

“पूर्वग्रह, थोडाफार वर्णद्वेष या सर्वावर तुम्ही मात कशी केलीत?”

“माझ्या सुदैवाने मला फारसे वाईट अनुभव आले नाहीत. थोडी तफावत जाणवत होती, एके ठिकाणी तर मी एकमेव श्वेतवर्णी नसलेला कर्मचारी होतो… वरच्या हुद्द्यावर जायला कठीण जातंय असं वाटत होतं. रॉस पेरोचं उदाहरण डोळ्यासमोर आलं. IBM सोडून स्वतःची कंपनी त्याने काढली. मी विचार केला आपणही तसं का करू नये?”

त्याच विचारात १९९० साली त्यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला: CMC Realty! एकीकडे सिग्ना (Cigna) वैद्यकीय विमा कंपनी, तर दुसरीकडे – आता काळाच्या पडद्यामागे गेलेल्या पण एके काळी देशभर चित्रफिती पुरवण्याचे काम करणारे – Blockbuster यांसाठी इमारती व संकुलं बांधणं, तसेच KCI Research & Development चा बांधकाम प्रकल्प… जागा वेगळ्या आणि आव्हानं वेगळी!

या गप्पा होऊन जवळ जवळ ३ आठवडे झाले. त्या शब्दांकित करायला वेळ लागला कारण श्री. गायतोंडे कुठल्याच चाकोरीत बसत नाहीत; त्यांच्याशी बोलताना जाणवतं की अमेरिकेवर प्रेम असणारा तो एक अस्सल भारतीय मनुष्य आहे. इथे आल्यावर त्यांनी अमेरिकन पेहेराव, रीतीरिवाज, हस्तांदोलन कसं करायचं, कसं वागायचं यावर पुस्तकं वाचली, स्वत्व न गमावता इथली संस्कृती व शिष्टाचार आत्मसात करून घ्यायचा प्रयत्न केला. सकाळी सूट-बूट तर संध्याकाळी ….

…. संध्याकाळी भारतीय बैठक (मांडी!) घालून २-३ तास तानपुरा वाजवणं आणि शास्त्रीय संगीत ऐकणं. संगीताची भूक केवळ आस्वाद घेण्यावर थांबली नाही तर तिने संगीत शिक्षणाला प्रवृत्त केले. नोकरी, संसार, व्यवसाय यात व्यस्त असताना फक्त कानसेनाची भूमिका करता येत होती. मात्र ६० व्या वर्षी त्यांनी पं. विजय कोपरकर यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने ‘सा रे ग म’ चे धडे घ्यायला सुरुवात केली! गेली ८-१० वर्षं सकाळी ६ ते ८ रोज रियाज करतात. “मी तसा बहुरूपी आहे” मला हसत हसत ते म्हणाले. खरं आहे पण या बहुरूप्याची सगळीच रूपं खरी आहेत, मराठी मंडळाला योगदान करणारा, कुटुंबवत्सल आजोबा (८ वर्षाच्या नातवाकडून ते तराणा शिकत आहेत), संगीतोपासक, अमेरिकेला कर्मभूमी मानून मान व प्रेम देणारा हा बहुरूपी आहे!

सुविद्य पत्नीची साथ असल्याशिवाय हे शक्य नाही. सौ. सरिता (पूर्वाश्रमीच्या ‘सरिता धोंड’) यांनी हाफ़्किन्स संस्थेतील नोकरी व संशोधन सोडून अमेरिकेत संसार थाटला. इथे आल्यावर मुलांची ‘ममा’ या भूमिकेत पूर्ण तल्लीन झाल्या. त्याही चाकोरीबाहेरची वाट शोधत पातांजल योग शिकल्या, लोणावळ्याला जाऊन त्यात प्राविण्य मिळवले आणि आता डल्लास मध्ये रोज योग शिक्षणाचे वर्ग भरवतात. मुलं मोठी झाली, मुलगा सलिल याने व्यवसायावर स्वतःचा ठसा उमटवला आहे. काळाच्या गरजेप्रमाणे औद्योगिक व राहण्याचा जागा बांधण्याचे प्रकल्प त्याने हाती घेतले आहेत. मुलगी, लीना, वकील आहे. तिनेही जवळच संसार थाटला आहे सुभाषना, गाण्याची पट्टी आणि आयुष्याची भट्टी जमल्याची कृतार्थता बोलण्यातून जाणवत होती. सिमेंटपासून सुरांकडे चाललेला त्यांचा प्रवास असाच सफल व आनंददायी होवो ….

(शब्दांकन – ज्योत्स्ना दिवाडकर)