Sameer Sarvat

sameersarvat2निव्वळ आकडेवारीच्या भाषेतच सांगायचं झालं तर – दर महिन्याला एकशे पंचाहत्तर देशातून सरासरी एक लाख ब्यांण्णव हजाराहून अधिक लोक मायबोलीच्या साईटला भेट देतात. साईटवरचा वाचक सरासरी नऊ मिनिटे वाचन करतो. आणि दर महिन्याला २४ लाखाहून अधिक पाने वाचली जातात. फेसबुकवर एक लाख सोळा हजार आणि गुगल प्लसवर तीन लाखाहून अधिक followers आहेत. Perry Mason च्या शब्दात सांगायचं झालं तर – and I rest my case.

समीरशी बोलतांना “मायबोली”च्या आजवरच्या वाटचालीचा मागोवा घेत होतो. १९९६ साली maayboli.com ह्या वेबसाईटची सुरुवात झाली. या वेबसाईटचं नाव सुचवलं होतं उत्तरा आळतेकर यांनी; तर श्रीकृष्ण पाटील यांनी सुरुवातीचा फॉन्ट डेव्हलप करून दिला होता. रवी परांजपे यांची चित्रे ऑनलाईन ग्रीटिंग्ज म्हणून वापरली होती. समीर सांगत होता की अमेरिकेत असल्यामुळेच हे शक्य होऊ शकलं. कारण त्या सुमारास भारतात इंटरनेट अर्थातच अजून रुजलं नव्हतं. याशिवाय ह्या साईटचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही मराठीच नाही तर देवनागरीतली पहिली वेबसाईट आहे. मायबोलीनं १९९७ सालापासून विविध फोरम चालू केले. या फोरमवर लिखाण करून अनेक जणांना पहिलं व्यासपीठ मिळवून दिलं. १९९९ साली “सोबती” ही इंटरनेटवर प्रकाशित झालेली पहिली कादंबरी ठरली. २००० साली मायबोलीतर्फे सभासदांसाठी अनेकविध उपक्रम सुरु करण्यात आले. “ऑनलाईन गणेशोत्सव” हा त्यापैकीच एक. बे एरियातील श्री. मनोज ताम्हनकर यांनी संगीतबद्ध केलेली आणि राहुल देशपांडे, पं. रघुनंदन पणशीकर यांनी गायलेली गाणी मायबोलीवर प्रथम प्रकाशित झाली. २००३ साली मुंबई पत्रकार सेवा संघाचा पुरस्कार मिळाला. साहित्यिकांच्या आवडत्या शब्दांत सांगायचं झालं तर श्री. अजय गल्लेवाले यांनी लावलेल्या इवल्याशा रोपाचा आता वटवृक्ष झाला होता.

मायबोली तर्फे अनेक सामाजिक उपक्रम पण राबवले जातात. राजकारणाशी संबंधित नसलेल्या संस्थांच्या मार्फत महिला दिनानिमित्त गरजू महिलांच्या मदतीसाठी मायबोलीच्या विविध फोरमतर्फे व्यासपीठ उपलब्ध केले जाते. याबरोबरच मायबोलीचे T-Shirts विकून येणारे उत्पन्न गरजू संस्थांना मदत म्हणून दिले जाते. सर्व सभासदांसाठी त्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी व्हाव्यात म्हणून पुण्यात वर्षा सहलींचं आयोजन केलं जातं. समीरच्या शब्दात “आभासी जगातले लोक एकमेकांना प्रत्यक्षात भेटतात”.

२७ फेब्रुवारी या जागतिक मराठी दिनानिमित्त मायबोली साईटवर अनेकविध लेख, ऑडिओ, व्हिडिओ यांची रेलचेल चाललेली असते. मराठी बातम्या एकत्रितरित्या वाचायला मिळाव्यात म्हणून मराठी बातम्यांचा Data Feed सुरु केला. त्याला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून मराठीबरोबरच हिंदी आणि गुजराथी बातम्यांचे Data Feed पण सुरु केले.

समीर १९९९ सालापासून मायबोलीचा सभासद आहे व २००७ सालापासून मायबोलीच्या बोर्डावर डायरेक्टर आहे. याशिवाय समीरच्या वैयक्तिक जीवनात मायबोलीचे वेगळेच महत्व आहे. समीर व त्याची पत्नी मायबोलीच्या द्वारे ऑनलाईन पहिल्यांदा भेटले व त्याची परिणिती प्रेमविवाहात झाली. समीर गंमत म्हणून सांगत होता, त्याच्या परिचयातील आठ-दहा तरी पती-पत्नींची ओळख मायबोली साईटवर होऊन, नंतर लग्नं जुळलेली आहेत. आजकाल गुगल जरी इंटरनेट क्षेत्रातील दिग्गज असले तरी त्यांच्याही सुरवातीच्या दिवसांत “मायबोली”ने दिलेल्या सहकार्याची समीर आठवण गंमत म्हणून सांगत होता – १९९६-९७ मधे वेबसाईट सर्च करायच्या ऐवजी लोक याहूवर जाऊन, वेगवेगळ्या विभागात जाऊन वेबसाईटवर क्लिक करायचे. नुकतंच एक नवीन सर्च इंजीन सुरु झालं होतं जे फारसं कुणाला माहीत नव्हतं. या नवीन सर्च इंजिनमधे कप्पे नव्हते. सरळ फक्त शोधायचं. या नवीन सर्च इंजिनने तेंव्हा सुरु असणाऱ्या काही वेबसाईटबरोबर पार्ट्नरशीप केली; की जर वेबसाईटवरच्या काही वाचकांना या नवीन सर्च इंजीनकडे पाठवलं तर प्रत्येक query ला काही सेंट्स (पैसे) ते त्या पाठवणाऱ्या वेबसाईट्ला देतील. अशा रीतीने मायबोलीला पहिला पैसे देणारा ग्राहक मिळाला आणि गुगलला थोडाफार ट्रॅफिक. तर आजकाल गुगलच्या “Helping Women Get Online” hwgo.com या महिलांना इंटरनेट साक्षर बनवण्याच्या उपक्रमात विविध मजकूर (विशेषतः भारतीय महिलांसाठी उपयुक्त) पुरवून; बदलत्या युगातील सामाजिक जबाबदारीचं भान जबाबदारीने पार पडलं आहे.

उत्तरोत्तर वाढत गेलेल्या व्यापामुळे Maayboli Inc. ची २००७ साली स्थापना करण्यात आली. २०११ साली प्रदर्शित झालेल्या “देऊळ” सिनेमाचे “माध्यम प्रायोजक” झाल्यापासून, मायबोलीने या social networking च्या वेगळ्या प्रांतातसुद्धा वाटचाल सुरु केली. आगामी, नवीन येऊ घातलेल्या मराठी नाटक, सिनेमा यांविषयी वाचकांपर्यंत माहिती पोचवणं, मायबोलीवर त्यासंबंधी फोरम तयार करून चर्चा, परिसंवाद, स्पर्धा, मुलाखती यांसारखे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून विजेत्यांना सिनेमाच्या प्रीमिअर शो ला घेऊन जाणं…. इत्यादि गोष्टींद्वारे त्या नाटक, सिनेमाचं promotion/marketing करणं किंवा आजकालच्या भाषेत “हवा” करणं… हे सुद्धा वाचक-सभासदांच्या सक्रिय सहभागाने चालू असतं.

BMM जसं मराठी मायबोलीशी आपल्या सर्वांचं नातं दृढ ठेवण्याचा प्रयत्न करत असतं; तसंच Maayboli.com सुद्धा BMM शी पूर्वीपासून निगडित आहे. २००१ सालापासून BMM विषयक वृत्तांत मायबोलीवर येण्यास सुरुवात झाली. २००७ साली BMM चा पुरस्कार देखील मायबोलीला मिळाला. २०१३ सालापासून मायबोली BMM चे “माध्यम प्रायोजक” आहेत.

तर अशा या मायबोलीला ह्या वर्षी २० वर्षं पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने मी समीरला व त्यांच्या सर्व टीमला शुभेच्छा देऊन २०१७ सालच्या BMM ला आवर्जून उपस्थित राहण्याचे निमंत्रण आमच्या BMM समिती तर्फे देऊन त्याचा निरोप घेतला.

शब्दांकन – संजय मेहेंदळे