Dr. Nikhil Dhurandar

sameersarvat2डॉ. निखिल धुरंधर

शब्दांकन – ऋतूज देशपांडे

“पंत, तुझी कुंभ रास आणि कुंभ लग्न आहे. नुसतं वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार!”. पु. ल. देशपांडेंच्या ‘बटाट्याची चाळ’ मधील उपास कथेतील ‘भिकोबा मुसळे’ नी पंतांना सांगितलेलं हे वजनाबाबतचं गुपित माझ्या मनात नेहमी घुमत असतं. इकडे कथेतल्या पंतांप्रमाणे माझं वजनसुद्धा काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आणि तिकडे तो अभिनेता आमीर खान एका सिनेमामध्ये ३० किलो कमी करतो! काय हा चमत्कार! योगायोगाने या चमत्कारामागच्या खऱ्या ‘योग्याशी’ बोलण्याची संधी मला मिळाली. तो विज्ञाननिष्ठ योगी म्हणजे डॉ. निखिल धुरंधर.

“म्हणजे… म्हणजे तो विषाणू (virus) कोंबड्यांना लठ्ठ करतोय?”. लठ्ठपणावर तोडगे देणाऱ्या मुंबईतील सर्वात कीर्तिवंत डॉक्टर, डॉ निखिल धुरंधरांचा हा प्रश्न पशुरोगनिदानतज्ञ डॉ शरद एम. अजिंक्यांवर अचानक धडकला. “खरंतर, मलापण माहित नाही. तूच का नाही शोधत याच उत्तर! तू पण संशोधन करत आहेस” डॉ अजिंक्यांनी नि:संकोचपणे उत्तर दिले. ‘एका विषाणूची लागण झाली तर कोंबड्या मरतात … पण त्या आधी त्या जाड होतात’ डॉ निखिलच्या डोक्यातील चक्रे घरघर फिरायला लागली. ‘माणसांच्या लठ्ठपणालापण असाच कोणता विषाणू तर कारणीभूत नसेल’? जणू उत्तर सापडले होते. आता अवकाश होता तो काही वैज्ञानिक प्रयोगांचा!

खरंतर, लठ्ठपणा कमी करण्यासाठी आजपर्यंत डॉ निखिल यांनी सुमारे १०,००० रुग्णांवर उपचार केले होते. त्या काळी लठ्ठपणावर उपचार करण्यात डॉ निखिल हे भारतातील सर्वोत्तम डॉक्टर्स पैकी एक होते. तेव्हा जरी डॉ निखिल कीर्तिवंत होते, त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता होती, तरी त्यांच्या समाधानाला पूर्णत्व आले नव्हते. याचे मुख्य कारण म्हणजे उपचार करूनही काही रुग्णांना लठ्ठपणा कमी करण्यासाठी परत परत यावे लागत असे. ‘का होतात हे लोक पुन्हा लठ्ठ? याचे कारण काय? याला उपाय कोणता?’ असे काही प्रश्न कधीचे डॉ निखिल याच्या मनात घोळत होते. आजचा “म्हणजे! तो विषाणू त्या कोंबड्यांना लठ्ठ करतोय?” हा प्रश्न मात्र आधीच्या बऱ्याच प्रश्नांच्या उत्तराच्या स्वरूपात उभा होता.

डॉ धुरंधर म्हणतात “डॉ अजिंक्यचे ‘मला माहित नाही’ हे उत्तर टर्निंग पॉईंट होते”. आज Texas-Tech युनिव्हर्सिटी चे Department of Nutritional Sciences चे Chair प्रा. निखिल धुरंधर हे ‘infactobesity (विषाणूजन्य लठ्ठपणा)’ या क्षेत्राचे जनक म्हणून ओळखले जातात. विषाणू AD-36 ची लागण झाल्यास माणूस लठ्ठ होण्याची शक्यता जास्त असते हा शोध डॉ धुरंधरांनी लावला आणि लठ्ठपणाविषयीचा जागतिक वैज्ञानिकांचा दृष्टिकोनच बदलून गेला. डॉ धुरंधरांचा शोध इतका महत्वाचा आहे की, आफ्रिकासोडून जगातील जवळपास इतर सर्व देशात AD-36 वर आता संशोधन सुरू आहे. गेल्या काही दशकांमध्ये डॉ धुरंधरांची ‘Obesity आणि Nuitrition’ चा अग्रगण्य तज्ञ (leading expert) म्हणून ख्याती झाली आहे. २०१४-२०१५ मध्ये डॉ धुरंधरांची प्रतिष्ठित अशा The Obesity Society चा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. २०१५ मध्ये Osborne and Mendel Award प्रदान करून डॉ धुरंधरांच्या कार्याला गौरविण्यात आले. डॉ धुरंधरांची शंभराहून अधिक शोधपत्रे (Journal articles) आणि patents प्रसिद्ध आहेत.

मुंबईत एक नावाजलेला डॉक्टर असून देखील, ते सर्व सोडून, विषाणू आणि लठ्ठपणा यावर संशोधन करण्यासाठी US मध्ये येण्याचा धाडसी निर्णय डॉ निखिलने घेतला. “US ला आल्यावरही माझ्या संशोधनाबद्दल विविध वैज्ञानिकांना जवळपास ३०० पत्रे पाठविली, पण बहुतेक निरुपयोगी ठरली.” योगायोगाने दुसऱ्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात योग्य संधी गवसली आणि युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन मधील प्रा Atkinson सोबत डॉ निखिल च्या संशोधनास सुरुवात झाली. मग कित्येक प्रयोगांअंती, अनेक अडचणींना सामोरे जात, अथक प्रयत्नांद्वारे विषाणू आणि लठ्ठपणा यातील संबंध सिद्ध झाला. डॉ निखिल म्हणतात “सुरुवातीला कुणालाच विश्वास नव्हता. प्रयोगांचे पुरावे दाखवूनही इतर वैज्ञानिक हे मान्य करायलाच तयार नव्हते की विषाणूमुळे लठ्ठपणा होऊ शकतो. अगदी टोकाच्या टिप्पण्या व्हायच्या. कुणी म्हणायचे ‘हा शोध नोबेल पारितोषिक मिळण्याच्या लायकीचा आहे’, तर कुणी म्हणायचे ‘हे हास्यास्पद संशोधन आहे’. तो काळ बराच अवघड होता”. आज मात्र डॉ धुरंधरांचे शोध जगमान्य झाले आहेत. इतकेच काय तर जगातले बहुसंख्य शास्त्रज्ञ डॉ धुरंधरांच्या संशोधनाच्या पायावरच अविरतपणे नवीन संशोधन करत आहेत. डॉ धुरंधरांच्या शोधांनीच ‘infactobesity’ या नव्या क्षेत्राचे दरवाजे उघडले गेले. ‘त्याचे समाधान मला वाटते’ असे डॉ धुरंधर सांगतात.

डॉ निखिल नुकतेच चर्चेत आले ते आमिर खानमुळे. आमिर खान ने दंगल सिनेमा साठी वजन खूप वाढविले आणि नंतर जवळपास ३० किलो वजन कमी करून पुन्हा फिट झाला. या सिनेमात त्याने ‘वडील’ व ‘तरुण’ अश्या दोनही भूमिका केल्या. या ‘Fat to fit transformation’ मागे डॉ निखिलचे मार्गदर्शन होते. आमिर खान म्हणतो “डॉ निखिल धुरंधरांचा वैज्ञानिक पद्धतीने वजन कमी करण्याचा व्यापक अनुभव आणि त्यांचे सखोल ज्ञान यांनी माझी वजन घट साध्य करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. निखिल शिवाय हे साध्य करणे शक्यच नव्हते”. आमिर खानची वजन घट ही डॉ धुरंधरांच्या ज्ञानाचा ताजा नमुना आहे.

संशोधनाबद्दल बोलतांना डॉ धुरंधर सांगतात, “जेंव्हा वेगवेगळ्या animal models वर विषाणू लागणीचा परिणाम आम्ही अभ्यासत होतो, तेंव्हा असं लक्षात आलं की, विषाणूंमुळे त्या प्राण्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण (blood sugar) कमी होते. त्यातूनच विचार सुचला की या विषाणूंचे genes कदाचित मधुमेह (diabetese) रोग्याची रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. बऱ्याच संशोधनानंतर आज त्या विषाणूच्या genes वर आधारित असे औषध तयार करण्याबाबतीत आमचे १२-१५ जागतिक patents झाले आहेत. यातून लवकरच मधुमेहावर औषध तयार होईल असा मी आशावादी आहे.” आज ‘मधुमेहाची जागतिक राजधानी’ झालेल्या भारतासाठी, डॉ धुरंधरांचे संशोधन एक आशेचा किरण घेऊन येत आहे असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही.

विशेष म्हणजे शोधपत्रे लिहिण्यात तरबेज अशा डॉ धुरंधरांच्या लेखणीला मराठी नाटके लिहिण्याची पण आवड आहे! काहीवर्षांपूर्वी डेट्रॉईटकरांपुढे डॉ धुरंधरांनी लिहिलेली ‘मंत्री ज्वर’, ‘Play safe बर्वे’ ह्या नाटकाचे प्रयोग पण सादर झाले होते. “आजूबाजूच्या व्यक्तिमत्वाचे निरीक्षण करणे हा माझा छंद आहे” असे डॉ निखिल सांगतात. डॉ धुरंधरांचे शास्त्रीय ज्ञान, त्यांची लेखनाची आवड आणि मराठी बद्दलची आपुलकी यांचा मेळ घालणारे त्यांचे ‘वजनातील चढउतार: एक सापशिडीचा खेळ’ हे मराठी पुस्तकही प्रसिद्ध आहे. नाटकात काम करणे, तसेच क्रिकेट, raquetball सारखे खेळ खेळणे, पोहणे हे डॉ धुरंधरांचे इतर छंद. हे सारे त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची झलक देतात.

“मग या the man behind fat to fit transformation चा आमच्या वाचकांना फिट राहण्यासाठी काय संदेश आहे ?” असे विचारताच प्रा. धुरंधर मोकळेपणाने हसले आणि म्हणाले “फार अवघड प्रश्न आहे”. ते म्हणतात प्रत्येकाची जीवनपद्धती आणि प्रकृती वेगवेगळी असते. “त्यामुळे सर्वांना लागू होईल असा सल्ला देणं कठीण आहे. पण काही सांगायचेच असेल तर मी म्हणेन सर्वात आधी ‘मला fit व्हायचं आहे’ हा विचार मनात रुजणं महत्वाचे आहे. असा विचार मनात रुजला तरच fit होणं शक्य आहे”
शेवटी डॉ निखिलनी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या २०१७ अधिवेशनाला येण्याची विशेष इच्छा व्यक्त केली आणि अधिवेशनाला हार्दिक शुभेच्छा दिल्या. खरंच प्रा. निखिल धुरंधरांशी गप्पा मारणे हा एक सुंदर अनुभव होता. यशाची एवढी उंची गाठूनही, त्यांच्या बोलण्यातील सहजता, त्यांच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा, त्यांच्या असामान्यत्वाचे दर्शन घडवतो. या मराठमोळ्या संशोधकाच्या बुद्धीला, त्यांच्या प्रयत्नांना आणि कर्तृत्वाला सलाम!