Mukund Marathe

mukund maratheपुरे झाली आता तुझी नाटकं. तेच लक्ष जरा अभ्यासात घाल”. असं “प्रोत्साहन” जर घरच्यांकडून मिळालं असतं तर मुकुंद मराठे या रंगयात्रीची नाट्यप्रेमाची हरळी बालपणीच उपटली गेली असती. पण सुदैवाने तसं झालं नाही; त्यामुळे बे एरीयातल्या लोकांना एक धडपड्या, नाटकांना वाहून घेतलेला अभिनेता, दिग्दर्शक, समन्वयक अशा एकापेक्षा एक विविध रुपात मुकुंद मराठे बघायला मिळाला. मुकुंदच्या मातोश्री स्वतः उत्तम लेखिका, घरात नाटकांविषयी, संगीताविषयी पोषक वातावरण अशा कलासक्त पार्श्वभूमीचा कळत नकळत परिणाम मुकुंदमधील कलाकाराच्या जडणघडणीवर होत होता.

पुलंनी एके ठिकाणी लिहून ठेवलंय “जगण्यासाठी महत्वाचं असतं ते जगण्याचं प्रयोजन”. मुकुंदशी बोलतांना सतत वाटत होतं की ह्या माणसाला ते प्रयोजन सापडलंय. लोकमान्यनगर सोसायटीत हौस म्हणून सुरुवात केलेला नाट्यप्रवास, पोद्दार कॉलेजमध्ये छंदात रुपांतरीत झाला, आणि अमेरिकेत आल्यावर तर त्याचं व्यसन जडलं…. दुर्दैवाने मराठीत “व्यसन” शब्दाला लगेच वेगळाच वास येतो आणि मग आपण उगीच passion शब्दाचा आधार घेतो. पण मुकुंदशी बोलतांना मला आपलं वाटत होतं की नाटक ह्या माणसाचं “व्यसन” च आहे. हा माणूस नाटकाशिवाय जगूच शकणार नाही. लोकमान्यनगर सोसायटीतील विविध नाटकांचं दिग्दर्शन चालू असताना सोसायटीतल्या शॉर्ट-सर्किट चं रूपांतर लग्नात झालं… ऱेखाने मुकुंदच्या कला-जीवन प्रवासात अगदी समरसून साथ दिली…. अगदी नाटकांत कामं करण्यापासून ते आजकाल गॅरेजमधे असलेला सेट्सचा पसारा चालवून घेण्यापर्यंत रेखा आणि मुकुंदचा संसार नाटकमय झाला आहे.

१९८५ साली अमेरिकेत आल्यावर बे एरियात हळूहळू ओळखी झाल्यावर मंडळाच्या नाटकांमधे कामं करायला, नाटकं बसवायला सुरुवात केली. त्याची आठवण सांगतांना मुकुंद म्हणाला “एके वर्षी नाटकाचा प्रयोग झाल्यावर अरुण लोंढेंनी, ज्यांनी यापूर्वीची बे एरियातली बहुतेक सर्व नाटकं बसवली होती, रंगमंचावरूनच जाहीर केलं की यापुढचं नाटक मुकुंद बसवेल”. अशाप्रकारे लाँच झाल्यामुळे मुकुंदला चांगला ब्रेक मिळाला व दिग्दर्शक म्हणून बस्तान बसायलाही मदत झाली. त्यानंतर मुकुंदने अनेक उत्तम नाटकं बसवून लोंढेंचा विश्वास सार्थ करून दाखवला. आकडेवारीच सांगायची झाली तर मुकुंदने अभिनय केलेली, बसवलेली, “कला”तर्फे बसवलेली अशा नाटकांची संख्या पन्नासच्या वर सहज जाईल!

मुकुंदनी बसवलेल्या काही नाटकांचे यापूर्वीच्या BMM मधेही प्रयोग झालेले आहेत. १९९१ च्या LA येथील BMM मधे “दुरदेशीचा वग अर्थात Yankee देशात किसनदेव” हा वग बसवला होता. मुकुंद सांगत होता “आत्तापर्यंत दोनएकशे लोकांसमोर प्रयोग सादर केलेले. पण आता एकदम दोन हजार लोकांसमोर प्रयोग होत होता. एव्हढ्या लोकांच्या टाळ्या, प्रतिसाद, हशा कसा एखाद्या लाटेसारखा अंगावर येत होता. एक वेगळाच आणि अविस्मरणीय अनुभव होता”. त्यानंतर १९९९ च्या सॅन होजे येथील BMM मधे तब्बल ९६ कलाकारांची टीम घेऊन “खेळ मांडियेला” चा प्रयोग, तसंच २००० साली पुलंना मानवंदना म्हणून ६० जणांची टीम घेऊन “नॉन स्टॉप पुलं” हा सलग नऊ तासांचा कार्यक्रम मुकुंद आणि त्याच्या नाटकवेड्या सहकाऱ्यांनी सादर केला.

असे दोन मोठे प्रोजेक्ट सादर केल्यावर सगळ्यांच्या डोक्यात एक विचार आला की कार्यक्रमाच्या निमित्तानी आपण एकत्र येतो, सहा सहा महिने तालमी करतो, त्या प्रवासाचा आनंद लुटतो आणि पुन्हा पुढच्या प्रोजेक्ट पर्यंत महिनोंमहिने भेटत नाही. तर असा काहीतरी platform असायला पाहिजे की ज्यामुळे आपल्यासारख्या समविचारी मंडळींना एकत्र येऊन सातत्याने काही करता येईल. त्यातूनच २००२ मध्ये “कला” California Arts Association (CALAA) या संस्थेचा जन्म झाला. याच सुमारास “कला”चा अभय पाटील हा “सूर्य पाहिलेला माणूस” ह्या नाटकाने, आणि विशेषतः डॉ. लागूंनी सॉक्रेटीसच्या भूमिकेत केलेल्या पंचेचाळीस मिनिटांच्या मोनोलॉगने, अक्षरशः भारावून गेला होता. अभयने त्या नाटकाचं जतनीकरण (archival) करायचं ठरवलं. त्याचा संदर्भ घेत मुकुंद सांगत होता, आम्हाला “कला” चं मिशन सापडलं – आपल्याला जे आवडतं ते करताना आपल्याला कलेसाठीही काही करता येणं शक्य आहे…… आपण घड्याळाचे काटे फार काही मागे फिरवू शकत नसलो तरीही जे काही समोर आहे ते Digitized करून जतन नक्कीच करू शकतो.…. बालगंधर्व, नानासाहेब फाटक आपण पाहिले पण नाहीत; पण जे अभिनयाचे मापदंड आपण पाहतोय ते तरी निदान पुढच्या पिढीसाठी वारसा म्हणून आपण जपून निश्चित ठेवू शकतो. म्हणूनच “कला”चं ब्रीदवाक्य आहे – “कलेमधून कलेसाठी कलारत राहायचं”.

याच जाणिवेतून “आनंद ओवरी”, “विजय तेंडुलकर आणि हिंसा” documentary ह्यांची निर्मिती. “सतीश आळेकर” documentary, “महेश एलकुंचवार” documentary, “भालचंद्र नेमाडे” documentary या काहीतरी वेगळं करणाऱ्या प्रोजेक्ट्सना केलेली आर्थिक मदत…. याचबरोबर “समीप रंगमंच” – प्रेक्षक आणि कलाकार यामधली चौथी भिंत काढून टाकून प्रेक्षकांच्या मध्ये एकांकिकेचे नाट्यप्रयोग; हा एक नवीन प्रयोग…. “मागणी तसा पुरवठा” हे सोयीस्कर समीकरण बाजूला ठेवून, लोकांना दर्जेदार आणि चांगलं काही बघायला मिळावं यासाठी वेळोवेळी केलेली धडपड…. “कला”साठी “तीन पैशाचा तमाशा” नाटकाच्यावेळी उत्कृष्ठ निर्मितीमूल्य जपण्यासाठी भारतातून खास बनवून घेतलेले professional साऊंड ट्रॅक्स…. अशा अनेक आठवणींतून “कला”चा विविध अंगांनी परिचय होत होता. “कला” संस्थेचा एकखांबी तंबू होऊ नये म्हणून समविचारी नाट्यवेड्या गुणी सहकाऱ्यांनी मुकुंदच्या जोडीने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या उचलल्या आहेत आणि “कला” च्या माध्यमातून अनेक नवनवीन “कला”कार, दिग्दर्शक, लेखक आज बे एरियात जाणकार आणि दर्दी प्रेक्षकांसाठी प्रयोगशील कलाकृती सादर करीत आहेत.

BMM च्या रसिकांना २०१७ सालीही “कला”तर्फे, मुकुंदने बसवलेले एखादे नाटक, किंवा “समीप रंगमंच”चा एखादा नवीन प्रयोग बघायला मिळेल अशी मी आशा बाळगतो. मुकुंदला व “कला”च्या सर्व सहकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा देऊन BMM-२०१७ साठी आमच्या टीमतर्फे आग्रहाचे निमंत्रण देऊन मी त्याचा निरोप घेतला.

शब्दांकन – संजय मेहेंदळे (Sanjay Mehendale)