Manohar Saradeshpande

sameersarvat2आहे मनोहर….. आणिही

मनोहर सरदेशपांडे……

काकांना निदान डेट्रॉईटच्या महाराष्ट्र मंडळात तरी सगळे जण ओळखतात असा आपला माझा समज होता. पण काही वर्षांपूर्वी झालेल्या एका गाण्याच्या कार्यक्रमात उपस्थित श्रोत्यांपैकी एका
बाईंनी काकांना “तुम्ही कोण?” असं विचारून माझी विकेट काढली (काकांची नाही)…. चूक बाईंची नव्हती, काकांच्या प्रसिद्धिपराङमुखतेची होती. काकांनीसुद्धा विचारलेल्या प्रश्नाला अत्यंत खिलाडूपणे, “आमच्या हिला सगळेजण ओळखतात, मला कोणीही नाही.” असा प्रमिलाकाकूंकडे अंगुलीनिर्देश करत खुलासा केला…..
सुमारे चाळीस-एक वर्षांपूर्वी ज्या मंडळींनी डेट्रॉईट महाराष्ट्र मंडळाची मुहूर्तमेढ रोवली, मंडळाच्या जडणघडणीसाठी धावपळ आणि धडपड केली, त्या लोकांमध्ये सरदेशपांडे काका-काकू यांच नाव आवर्जून घ्यावं लागेल. त्या दिवसांत जेमतेम पन्नास-साठ मराठी कुटुंबं आणि त्यांचे मिळून दीड-दोनशे सभासद एवढीच मंडळाची व्याप्ती होती. तरीपण लोकांचा उत्साह अवर्णनीय होता, घरचं कार्य असल्यासारखे लोक अगदी आपलेपणाने राबायचे. हाच आपलेपणा वृद्धिंगत होत आज “आपले मंडळ” अशी डेट्रॉईट महाराष्ट्र मंडळाची ओळख रूढ झाली आहे.
सरदेशपांडे काकांनी Genaral Motors मधील त्यांच्या नोकरीतून वेळेपूर्वीच निवृत्ती घेतली आणि निवृत्तीनंतर केवळ मी, माझे कुटुंब, माझे महाराष्ट्र मंडळ यापुरतंच आपलं विश्व मर्यादित न ठेवता एक स्वयंसेवक म्हणून आपल्या आयुष्याच्या सेकंड इनींगला जोमाने सुरवात केली. “Toughest job you ever will love” – Peace Corps! या अमेरिकन सरकारतर्फे चालविल्या जाणाऱ्या सेवाभावी संस्थेची माहिती घेऊन, त्यांचे निकष व चाचण्या पूर्ण करून या संस्थेत काका एक स्वयंसेवक म्हणून सामील झाले. याच संस्थेत का जावेसे वाटले असे विचारले असता; “१९६८ मध्ये हरिद्वार-मसुरी येथे Peace Corps संस्थेतर्फे भारताच्या मदतीस आलेले स्वयंसेवक मी पाहिले होते व त्यांच्या जगभर इतर देशांच्या सामाजिक / आर्थिक उन्नतीसाठी स्वयंसेवक पाठविण्याच्या उद्दिष्टाने मी प्रभावित झालो होतो” असं काका म्हणाले. स्वयंसेवक म्हणून निवड झाल्यावर दुसऱ्या देशात जातांना आम्हाला Peace Corps ची ३ ध्येये पाळावी लागतात – १) आमची ज्यांत निपुणता-कुशलता आहे त्या बाबतीत त्यांना सल्ला देणे २) अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणे – सांस्कृतिक दृष्ट्यासुद्धा. हॉलिवूड सिनेमामुळे अमेरिकेबद्दलची त्यांची काहीशी चुकीची बनलेली मते बदलायची ३) परत आल्यावर आपल्या Host Country बद्दलची सविस्तर माहिती अमेरिकन जनतेला देऊन Third World Countries बद्दलचे त्यांचे गैरसमज दूर करणे. या संस्थेतर्फे युक्रेनला दोन वर्षे जाण्यासाठी माझी निवड झाली. त्याआधी तीन महिने रशियन-युक्रेनियन भाषा, तिकडच्या चालीरीती, संस्कृती, रहाणीमान इत्यादींचे शिक्षण आम्हाला दिले गेले. प्रत्यक्षात तिकडे गेल्यावर मात्र शिकवलेली भाषा किती जुजबी होती याचा साक्षात्कार झाला. पहिल्याच दिवशी बस-स्टॉपवर कुठे जायचे आहे हेसुद्धा धड नीट सांगता येईना. कामाच्या वेळी दुभाषी सोबत असे, पण इतर वेळी मी एकटाच…. त्यामुळे मनाशी निश्चय करुन भाषेचे धडे पुन्हा गिरवायला सुरवात केली. स्थानिक लोकांच्या मानाने आमचे राहणीमान चांगले होते. माझ्याकडे TV होता; पण स्वयंपाक, कपडे धुणे स्वतःला करावे लागत असे; कामाला जाताना आणि इतर वेळेलाही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणे आम्हास बंधनकारक होते. माझ्या कामांतील पूर्वानुभवावरून मला युक्रेन मधील Kherson भागात Business Consulting चे काम सोपवण्यात आले. छोटे-मोठे व्यवसाय प्रगतिशील कसे बनवायचे, त्यांची बारीक-सारीक धोरणे, फायदे-तोटे यांची गणिते यांच्यात लक्ष घालून, त्यांचे प्रश्न सोडवायला मदत करून त्यांना प्रगतीपथावर नेण्यास मदत करणे असे कामाचे ढोबळ मानाने स्वरूप होते. या दोन वर्षात ओद्योगिक व बांधकाम संस्था यांच्याशी प्रामुख्याने माझा संबंध आला. युक्रेनमधील दोन वर्षांचा कालावधी पूर्ण करून अमेरिकेस परतल्यावर रदेशपांडेकाकांचा 1)American Red Cross of SE Michigan Chapter 2) Youth Assistant Mentor 3)Meals on Wheels 4) Senior Citizen Assistance या व इतरही सेवाभावी संस्थांबरोबर काकांचा संबंध आला. इसाबेला, कॅटरिना या चक्रीवादळांनंतर ह्युस्टन, व्हर्जिनिया, फ्लोरिडा येथे वादळाच्या आपत्तीतून वाचलेल्या लोकांच्या मदतीला अमेरिकन रेडक्रॉस तर्फे धावून जाणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये काका होतेच….. एकाकी राहणाऱ्या सिनिअर सिटीझन्सना, घरपोच ताजे जेवणाचे डबे पोचणाऱ्या Meals On Wheels या संस्थेतर्फे डबे पोचण्याचे काम काका आजही करताहेत. “या सर्व सेवाभावी संस्थांबरोबर काम केल्यामुळे माझा जगाकडे बघायचा एकंदरीत दृष्टिकोनच बदलला. मी खूपच सकारात्मक बोलू लागलो, टीका करायचे थांबलो, my cup is always ½ full now….” काका मिस्किलपणे पण अतिशय समाधानाने हसत हसत सांगत होते. BMM-२०१७ च्या स्वयंसेवकांची नाव नोंदणी सुरु झाल्यावर स्वयंसेवक म्हणून काका पुढे होतेच. नवीन येणाऱ्या स्वयंसेवकांना “शाबासकीची अपेक्षा न ठेवता, लोकं कदाचित तुमच्या चांगल्या कामालासुद्धा नावं ठेवतील याची तयारी ठेवून तुम्हाला नेमून दिलेले काम निष्ठेने, आवडीने करण्याचा प्रयत्न करा” असा आपुलकीचा सल्ला देत होते. आपल्या कुठल्याही समाजकार्याचा कोठेही डांगोरा न पिटणं, हा काकांचा गुणविशेष मला तरी अतिशय अनुकरणीय वाटतो. समाजकार्य करण्याच्या इच्छाशक्तीला कृतिशीलतेची जोड देण्याचा काकांचा हा प्रवास इतरांनाही मार्गदर्शक व प्रेऱणादायी ठरेल यात शंकाच नाही.