Manasi Karandikar

manasi2मतवाली नार: मानसी करंदीकर

पूर्वाश्रमीची उज्ज्वला सुळे १९८१ साली विवाहबद्ध झाली आणि ‘मानसी करंदीकर’ होऊन ती १९८२ साली अमेरिकेत दाखल झाली. मुंबईत बँक ऑफ इंडिया मध्ये ५ वर्षं नोकरी केली. इथे नोकरी व संसार … वरवर पाहता ही कहाणी परिचित वाटते. परंतू वास्तव थोडे वेगळे आहे. व्यक्तिगत आयुष्यात काही सखे सोयरे यांनी कठीण परिस्थितीत दगा दिला. अगदी पांडवांच्या मयसभेत यावेत तसे अनुभव आले; जमीन म्हणून विसाव्यासाठी पाय टेकवावा तर आगीचा चटका बसावा असे. तरीही कडवटपणा न येता भूतकाळाच्या नकारात्मक सावटातून बाहेर येऊन, नृत्याद्वारे सकारात्मक वातावरण निर्माण करणारी मानसी ही एक ‘मतवाली नार’ आहे!

मानसीने खरं तर नृत्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले नाही पण कला रक्तात भिनली असावी. शाळा कॉलेजात तिने ‘हौशी कलाकार’ म्हणून गाणी व नाच सादर केले होते. परंतु घरची परिस्थिती व शिस्त यामुळे ती हौस भागवता आली नाही. नृत्याची कारकीर्द पुढे फोफायच्या आत भारत सोडून ती अमेरिकेत आली. इथे ती मेडिकेडच्या औषध विभागात फेटाळले अर्ज पुन्हा तपासण्याच्या कामावर आहे. अमेरिकेत संसार थाटून बस्तान बसायला थोडा वेळ गेला. पण रंगभूमीवर तिचे योगदान घडायचे होते….
१९८६ साली एकदा डॉक्टरकडे गेली असताना कोणीतरी मराठी बोलणारं भेटलं व त्या ओळखीने मराठी मंडळात शिरकाव झाला. मग मात्र रंगमंचावर आगमन एकदम धडाकेबाज झाले. १९८८ साली तिने न्यूयॉर्क मराठी मंडळातर्फे (MMNY)तर्फे लोकनृत्य स्पर्धेत भाग घेतला, Federation of India Assoication ने आयोजित केलेली ही स्पर्धा अत्यंत चुरशीची असते. तिचा कार्यक्रम पहिल्या क्रमांकाचे बक्षिस मिळवून गाजला! या झुंजीत प्रथम पारितोषिक मिळणं हा मोठा सन्मान तर होताच परंतु त्यामुळे MMNY ची देखील शान वाढली! यशाबरोबर मान्यता मिळत गेली आणि आमंत्रणं येऊ लागली. त्यात उल्लेख करण्यासारखी संधी दिली महाराष्ट्र फाउंडेशनच्या सुनीता धुमाळेनी ! २००३ साली बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या परिषदेचं (BMM) यजमानपद होतं न्यूयॉर्ककडे. पुन्हा एकदा MMNY मार्फत त्याच्या उदघाटन प्रसंगी ७० कलाकारांना घेऊन मानसीने ‘आम्ही मराठी – आम्ही मराठी’ हा कार्यक्रम घडवला, बसवला व ठसवला!

संधी मिळताच ती लावणीच्या घनदाट जंगलात घुसली! “आली ठुमकत” हा १३-१४ गावरान, शृंगारिक व लाडिक लावण्यांचा भरगच्चं कार्यक्रम तिने ‘अथ ते इति’ बसवून, नाचून सादर केला. बस्स! तिचा ठसका, धडाकेबाज, high energy नाचणं प्रेक्षकांना इतकं भावलं की एकदा ‘कुणी तरी बोलवा दाजिबाला’ या तिच्या लावणीला once more मिळाला. तो जोश, ती मस्ती परत आणून असं नाचणं कठीण. तिने १ कडवं पुन्हा सादर केले मग मात्र – तिच्याच भाषेत – “कुणी तरी बोलवा डॉक्टरला” अशी वेळ आली! हा कार्यक्रम जबरदस्त (दुसरं कुठलंच विशेषण लागू नाही!) गाजला!

तुम्ही नृत्याकडे कश्या वळलात’ हा प्रश्न विचारायची वेळच आली नाही कारण घुंगरू व ठेका यांचे वेड सहज बोलताना देखील जाणवत होते. मनापासून भावलेला नाच म्हणजे लावणी व अनुषंगाने कथक! रंगमंचावर साथ करणाऱ्या नृत्यप्रेमींसाठी तिने आता ‘मानसी आर्टस्’ ही संस्था काढली आहे. खरं तर ‘मानसी आर्टस्’ ही निव्वळ संस्था नसून ते एक ‘नृत्य कुटुंब’ आहे. तिच्या सहनर्तकी रात्री दोनदोन वाजेपर्यंत तालमीसाठी थांबतात. ‘ताई’ किंवा ‘मावशी’ म्हणणाऱ्या तिच्या विद्यार्थिनी तिला मनापासून मानतात – ती त्यांना विनामूल्य शिकवते – मूल्य फक्त कलेचे.

जसे वाईट अनुभव आले तसेच चांगले अनुभव आले तेही चाकोरी बाहेरचे! मानसीच्या तालमीत तयार होऊन एका विद्यार्थिनीने लंडनच्या मराठी मंडळात एक नृत्य सादर केले. तिचा ठसा तिथेही जाणवला. ‘ही कलाकृती कोणाची’ असं विचारल्यावर साहजिकच त्यांना मानसीबद्दल उत्सुकता निर्माण झाली. आणि मग ‘सामना’ने तिची मुलाखत घेतली. ती वाचून चक्क माधुरी दीक्षितने कौतुकपर पत्र लिहून पाठवले! काही ओळख देख नाही पण निव्वळ मानसीच्या कलेला दाद देण्यासाठी माधुरीने हा खटाटोप केला. डॉ. उषादेवी कोल्हटकर (न्यूयॉर्क मधील प्रख्यात लेखिका व प्रकाशिका) यांनीही छान लेख लिहून प्रशंसा केली. अर्थातच पती मोहन करंदीकर यांची साथ आहे व शृंगारिक लावणीला दादही!

बहारदार व धडाकेबाज नृत्य सादर करणाऱ्या मानसीचा अजून एक पैलू कदाचित आपल्याला दिसला नसता. तोही योग अनपेक्षितपणे आला. त्याचं असं झालं, तिचा ठसका बघून -पुन्हा एकदा- एका जाणकार दिग्दर्शकाने तिची कुवत ओळखली. And the rest is …her story!

Theatrix ही न्यू जर्सी मधील प्रसिद्ध नाट्य संस्था रत्नाकर मतकरी लिखित “उद्गार” नावाचं एक आगळं वेगळं दोन अंकी नाटक बसवत होती. हा एक धाडसी प्रयोग होता आणि त्यासाठी त्यांना कोठल्याही चौकटीत ना बसणाऱ्या पण समर्थ अभिनेत्रीची गरज होती. मानसीच्या रूपात त्यांना ती मिळाली! तिच्या रंध्रारंध्राला आव्हान मिळेल अशी भूमिका चालून आली. समाजाला एरवी न झेपणारा विषय होता. चाळीशीतली स्त्री व पंचविशीच्या मुलगा यांच्यात शारीरिक आकर्षण निर्माण होते, त्यांच्या संबंधांवर आधारित ते नाटक होतं. त्यात तिला एक भूमिका पण २ व्यक्तिमत्व रंगवायची होती; एकीकडे प्रेमळ मालवणी गोमती तर दुसरीकडे मादक विदर्भी छटाक ‘मालकीण’ जी त्या तरुणाला वश करून घ्यायचा प्रयत्न करते! अशोक कामेरकर व अशोक वंझारी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने ही कठीण भूमिका साकार केली. तिने अशी चमक दाखवली की रत्नाकर मतकरी, आशालता वापगांवकर, सुलभा देशपांडे व जब्बार पटेल या दिग्गजांची तिला शाबासकी मिळाली!

या प्रयोगातील यशामुळे तिच्यासमोर अजून एक दार उघडले गेले. आता तिच्या ध्यानीमनी नाटक आहे. मराठी रंगभूमीवरचा एक हिरा अलीकडे तिच्या पदरात पडला: सुरेश खरेलिखित ‘मंतरलेली चैत्रवेल’ या नाटकाची मूळ संहिता तिला मिळाली. आता एकच ध्यास: त्या नाटकाचे सोने करायचे. नाटक असो वा नृत्यसमूह; ही मतवाली नार रंगमंचावर “ठुमक(त) चली” यावी आणि टाळ्यांचा कडकडाट व्हावा ही आमची सदिच्छा आहे!

शब्दांकन – ज्योत्स्ना दिवाडकर