Dr. Meena Nerurkar

sameersarvat2 डॉ. मीना नेरुरकर

शब्दांकन – संजय मेहेंदळे

डॉ. मीना नेरुरकर (http://www.meenanerurkar.com/)….. बस नाम ही काफी है…..
मीनाताईंविषयी असं जर म्हंटलं, तर ते अजिबात वावगं ठरणार नाही.
‘अ डॉट कॉम मॉम’ या आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळेस त्या डेट्रॉईटला आल्या असतांना त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग जुळून आला. गप्पांच्या सुरुवातीलाच “BMM च्या ‘प्रकाशझोत’ मालिकेसाठी काही बोलूयात का?” असं विचारल्यावर काहीही आढेवेढे न घेता त्या बोलत होत्या. खरं म्हणजे या लेखामुळे मीनाताईंवर प्रकाशझोत पडण्याऐवजी; त्यांच्यामुळे ही मालिकाच प्रकाशझोतात येण्याची बरीच शक्यता आहे.
BMM च्या जुन्या जाणत्या रसिकांना मीनाताईंची नव्याने ओळख करून द्यायची काहीच गरज नसल्याने गप्पांची सुरुवात अर्थात ‘डॉट कॉम मॉम’ चित्रपटापासून झाली. चित्रपट बनवतांना आयत्या वेळेला आलेल्या आर्थिक अडचणी, दिग्दर्शनाबाबत उभे राहिलेले पेचप्रसंग, काही सहकलाकारांचे अमेरिकेचे व्हिसा वेळेत न होऊ शकल्याने उभे राहिलेले प्रश्न, त्यामुळे मूळ कथानकात करावे लागणारे फेरफार…. या व अशा अनेक आव्हानांचा सामना करत याच चित्रपटात वापरलेल्या – “A woman is like a tea bag. You never know how strong it is unless it is put in hot water.” या उक्तीप्रमाणे मीनाताई व त्यांच्यातला कलाकार अधिकाधिक सक्षम व प्रगल्भ होत गेले.
BMM, उत्तर अमेरिका तसंच भारतातसुद्धा; कलेच्या क्षेत्रातील ताईंच्या योगदानाचा आदराने उल्लेख करणारे बरेच लोक सापडतील. गेल्या कित्येक BMM संमेलनांमध्ये मीनाताईंचा अथवा त्यांच्या कलापथकाचा कार्यक्रम झाला नाही असं झालेलं नाही. फिलाडेल्फिया येथे झालेल्या ‘अवघा रंग एकचि झाला’ या त्यांच्या संगीत नाटकाचा विषय गप्पांच्या ओघात अर्थात आलाच. मूळ संहिता प्रभाकर पणशीकरांना डोळ्यापुढे ठेऊन लिहिलेली, पुढे त्याच्यावर काम सुरु झाल्यावर त्याचे संगीत नाटकात रूपांतर होत गेले, पणशीकरांनी स्वतः लक्ष घालून केलेली कलाकारांची निवड, यात गोव्याला जाऊन विस्मृतीत गेलेल्या प्रसाद सावकारांसारख्या जुन्या नटाला मुद्दामून घेऊन येणे, ठाण्याला स्वरांगी मराठेंच्या आजींना भेटून तिच्यासाठी मन वळवणे, शुभारंभाच्या प्रयोगाआधी काही ‘हितचिंतकांनी’ आयत्या वेळेस उभं केलेलं विघ्न असे या नाटकाच्या प्रवासात आलेले भलेबुरे अनुभव मीनाताई सांगत होत्या…. हे नाटक BMM मध्ये तर गाजलंच पण भारतातही रसिकांच्या पसंतीस उतरून नाटकाचे साडेतीनशे च्या वर प्रयोग झाले.
गप्पांच्या ओघात बालमोहन, रुईया कॉलेज, GS मेडिकल कॉलेज असा झालेला शिक्षणप्रवास….. लहानपणापासून असलेली संगीत-नृत्याची आवड, त्यामुळे आधी शाळेत व नंतर GS मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनात दणक्यात सहभाग…. या मुद्द्यांना स्पर्श झाला; पण “तुमच्या कलाजीवनाची सुरुवात कशी झाली?”, “तुम्हाला पहिली संधी कधी व कोणी दिली?”, “तुमच्या आठवणीत घर करून राहिलेला एखादा प्रसंग सांगा”… असे साचेबंद मुलाखतीतले प्रश्न विचारायचेच राहून गेले….
स्वतः बाळासाहेबांच्या आग्रहाखातर ‘सामना’त लिहिलेले लेख; लोकप्रभा व लोकसत्ता यांमध्ये लिहिलेले लेख; ‘धन्य ती गायनॅक कला’, ‘ठसे माणसांचे’ ही पुस्तके; ‘सह्याद्रीचे स्वगत’, ‘अवघा रंग एकची झाला’, ‘स्वरगंगेच्या काठावरती’, ‘सूर माझे सोबती’ नाटकांच्या आठवणी….अमरीश पुरी, भास्कर चंदावरकर, सुधीर मोघे, प्रभाकर पणशीकर अशा अनेक नामवंतांबरोबर केलेल्या कामाच्या आठवणी…. उत्तर अमेरिकेतील नाटकासाठी milestone बनून राहिलेल्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ च्या आठवणी… वसंत बापटांनी लिहिलेल्या मूळ संहितेवर मीनाताईंनी लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नृत्य-दिग्दर्शन अशा विविध अंगांनी या नाटकाला अक्षरशः ‘चार चाँद’ लावले, हे नाटक उत्तर अमेरिकेतल्या लोकांनी डोक्यावर घेतलेच याशिवाय महाराष्ट्रातही या नाटकाने दोनशेहूनही अधिक प्रयोग केले. ”सुंदरा मनामध्ये….’ च्या भारतातील प्रयोगांच्या तालमींच्या वेळेची आठवण मीनाताई सांगत होत्या, तालमी माझ्या घरी व्हायच्या, तालमी चालू असतांना अर्थातच मधूनमधून चहा लागतोच, तो करण्यासाठी मी बाई ठेवलेल्या होत्या पण कलाकारांना चहा देणे, नंतर कप उचलणे कामं मी स्वतः करत असे…. तर एके दिवशी एक कलाकार मला म्हणाले ‘ताई, कप देण्याचं, उचलण्याचं काम तुम्ही नका करत जाऊ. चांगलं नाही दिसत ते.’ ….. मीनाताई म्हणाल्या, “मला तर काही कळेचना…. अमेरिकेतल्या माझ्या घरी होणाऱ्या तालमींना तर चहासुद्धा मीच करायचे, नंतरची आवराआवरी सुद्धा मीच करायचे…. तर इथे कप देण्याचं, उचलण्याचं काम करण्यात चांगलं न दिसण्यासारखं काय आहे?….. भारतात घरकामांना आपण इतर माणसं ठेऊन; आपण श्रमाचं महत्व कमी करतो”. मी ऐकतच राहिलो…. व्यवसायाने प्रतिथयश डॉक्टर, कलेच्या क्षेत्रात यश, नाव, पैसा भरपूर मिळवलेल्या मीनाताई श्रमाचं महत्व नुसतं जाणूनच नव्हत्या, तर घरकाम करणाऱ्या माणसांनाही माणूस म्हणून ओळखत होत्या…. पाय व्यवस्थित जमिनीवर ठेऊन होत्या…. ऐकताना खूप बरं वाटत होतं.
ताई बोलत होत्या आणि माझी श्रवणभक्ती चालू होती…. आणि डोक्यात एकीकडे “हे सगळं दोन पानांत बसवायचं???” हा विचार वळवळत होता. थोडा अतिशयोक्तीचा आरोप स्वीकारून सांगायचं तर, हे म्हणजे आशाबाईंची अथवा सचिनची मुलाखत घेऊन त्यांना दोन पानांत बसवण्यासारखं आहे…..
‘अवघा रंग एकचि झाला’ च्या मूळ संहितेवर आधारित चित्रपटाची निर्मिती, ‘Allopathy व योगसाधना’ यावर लिखाण, काही संगीतिका अशा काही आगामी प्रकल्पांविषयी ताई बोलत होत्या….. हे वादळ थांबायला तयार नाही……
‘डॉट कॉम मॉम’ या त्यांच्याच चित्रपटात आलेल्या “One Life to Live…..” या वाक्याप्रमाणे साहित्य, नृत्य, नाट्य, चित्रपट, अभिनय, दिग्दर्शन अशा विविध अंगांनी कलाजीवन समरसून जगलेल्या या कलावतीला मनोमन दंडवत व आगामी प्रकल्पांसाठी अनेक शुभेच्छा! BMM २०१७ च्या अधिवेशनासाठी मीनाताई ‘तमाशातील तमाशा’ हे नाटक घेऊन येत आहेत. या नवीन नाटकाची उत्सुकता आम्हाला आहेच पण तुम्हीही आतुरतेने प्रतीक्षा कराल असा विश्वास आहे.