Dr.Makarand Gore

Prakash Zotatडॉ. मकरंद गोरे…… अडीचशेच्या वर शोध निबंध, पंचावन्नच्या वर पेटंटस, Hewlett-Packard ची अकरा स्टार ऍवार्ड्स आणि इतर बरंच काही… असा ढाई किलोचा resume वाचला की जरा दडपायलाच होतं. मुलाखत घ्यायच्या आधी जरा तयारी करावी म्हणून साहेबांच्या Linked-In च्या पानावर त्यांचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला……

जुन्या अकरावीची शेवटची बॅच व नवीन बारावीची पहिली बॅच एकत्र आल्याने विद्यार्थी तर वाढलेले होते पण मेडिकलच्या सीट्स तर काही वाढलेल्या नव्हत्या. त्या गोंधळात मेडिकलची ऍडमिशन एका मार्काने हुकलेली…. त्यानंतर आलेली उद्विग्नता, झालेली चिडचिड आणि त्यातूनच केलेला दृढनिश्चय – मी डॉक्टर तर होईनच पण त्यापुढेही जाईन….

वडिलांचे झालेले अकाली निधन, त्यामुळे ओढवलेली हलाखीची परिस्थिती, अशा एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील मुलाची ही गोष्ट. शाळेत असतांना कायम पहिल्या दहा क्रमांकात असणारा, मेडीकलला जाऊन डॉक्टर व्हायचे स्वप्न बघणारा…… पण त्या कमी पडलेल्या एका मार्काने सगळ्या स्वप्नांची राख झाली……पण त्या राखेतूनच फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेत सुरु झाली ज्ञानाची अविरत उपासना…. आणि त्यातूनच उभे राहीले डॉ. मकरंद गोरे!
आधी पुण्यातून बीएस्सी, एमएस्सी. नंतर एडमंटन येथून डॉक्टरेट, नंतर ओरेगॉन युनिवर्सिटी, UofM Ann Arbor येथे रिसर्च फेलो अशी एकामागोमाग एक शैक्षणिक आव्हाने पेलल्यावर नोकरी/व्यवसाया निमित्त गोरेंनी संशोधन क्षेत्र कार्यक्षेत्र म्हणून निवडले.
1) Development of antisense DNA/RNA analogs. 2) Inkjet Technologies for pigment based inks. 3) Natural products therapy for HIV/HCV treatments ही विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील; पण विविध विषयांवरील संशोधने गोरेंच्या चतुरस्त्र ज्ञानाची कल्पना करून देतात. या व अशा बऱ्याच इतर संशोधनांनी डॉ. गोरेंचे नाव अमेरिकेतील १०० अग्रगण्य संशोधकांमध्ये गणले जाऊ लागले.

HP कंपनीतील त्यांच्या कार्यकाळात “LightScribe” या प्रॉजेक्टची संपूर्ण जबाबदारी डॉ. गोरेंवर होती. सर्वांना परिचित असलेल्या Blue Ray Optical Disc वरील coating हे ह्या संशोधनाचे व्यावसायिक रूप.
“एक नाही, तुझ्यासारखे दहा मकरंद गोरे इथे तयार कर”…. अशी गुरुदक्षिणा मागणाऱ्या गुरूंची इच्छा प्रमाण मानून; Research money is sinking fund हे ठाऊक असून देखील पुण्यात AJ Organica कंपनी त्यांनी स्थापन केली. आज या कंपनीने निर्मिलेली ८-१० औषधे बाजारात उपलब्ध आहेत.

जीव, भौतिक, रसायन या शास्त्रांबरोबरच; इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मासुटीकल इंजिनिअरिंग या सर्वच क्षेत्रात अविरत श्रम आणि संशोधनाने मिळवलेले विशेष प्राविण्य……ज्ञानाच्या दोन शाखांची यशस्वीरीत्या सांगड घालून सतत नवनवीन elements/products तयार करणे हे गोरेंच्या संशोधनाचे सार म्हणता येईल. आणि याच बरोबरीने मराठी माणसाला धंदा/व्यवसाय येत नाही हा समजही खोटा ठरवत त्यांची कितीतरी संशोधनं, औषधं बाजारात आहेत. YewSavin व AJ Organica या कंपन्यांचे ते अध्यक्ष आणि संचालक आहेत.

BMM शीही गोरेंचा जुना ऋणानुबंध…… कधी देणगीदार, व्याख्याते, तर कधी निव्वळ रसिक म्हणून, या ना त्या रुपात BMM शी गोरेंनी संबंध जपून ठेवलेले आहेत. BMM २०१७ साठी डॉ. गोरे Ambassador आहेत.

शब्दांकन – संजय मेहेंदळे