Atul Govande


“मुलाखत घेऊ का हे विचारणारी तुमची इमेल आली तर मला आधी वाटलं SPAM आहे की काय…” या त्यांच्या मिश्किल विधानाने आमच्या गप्पांना सुरुवात झाली.

त्यांचा जन्म जमशेदपूरचा, शिक्षण व वास्तव्य पुण्यात. १९९२ साली प्रशिक्षणानिमित्त ते डेल्टा टाउ या कंपनीत आले आणि इथल्या कामाच्या पद्धतीवर खूष झाले. अमेरिकेत यायचं यापेक्षा या कंपनीत यायचं असा ध्यास त्यांनी घेतला. परंतु ती इच्छा पूर्ण होइपर्यंत १९९७ साल उजाडले. श्री. गोवंडे हाडाचे ‘हार्ड वेअर इंजिनिअर’ आहेत; CNC, Wire Cut ह्या खास ‘तांत्रिकी’ शब्दांवरून विषय मराठी मंडळावर आला. त्यांच्या पत्नीने सिमी वॅलीच्या मराठी शाळेत शिकवायला सुरुवात केली आणि तिथून दोघांची मराठी मंडळाशी अधिक मैत्री व ओळख झाली. विशिष्ट हेतू किंवा अपेक्षा न ठेवता निव्वळ आवड म्हणून त्यांनी हळूहळू गणपती, दिवाळी अश्या कार्यक्रमांत मदत केली.
मंडळात ओळखी वाढल्या आणि एकदम बालपणीच्या नाटकवेडाला खतपाणी मिळावं अशी एक संधी चालून आली. त्या नाटकाचं नावच मुळी ‘नाटक’ होतं. त्यात गावाच्या पाटलाची भूमिका मिळाली.  हौसेखातर भाग घेतला पण अंगीचा अभिनय गुण लपून राहिला नाही. एक नाटक आंतर   – राज्य स्पर्धेपर्यंत पोचलं. त्या नाटकात ते एका मुलीच्या वडिलांची भूमिका करायचे आणि नाटकाच्या शेवटी त्यांचा मृत्यू होतो. “नाटक तिथेच संपते.  ह्या नाटकाचे एक परीक्षक होते मोहन जोशी. मी पडदा पडेपर्यंत श्वास रोखून धरला होता, आणि पडदा पडायला वेळ लागला. मी श्वास धरतो का सोडतो हे  मोहन जोशी ऐकत होते! म्हणजे परीक्षक कुठे लक्ष देतो बघा!” ही सूक्ष्म जाणीव आणि गावच्या पाटलाची भूमिका यामुळे गोवंडे यांना हेरले  स्वप्निल पागारे या नवोदित व हौशी लेखक-चित्रपटकाराने! अत्यंत गुणी व सजग कलाकारांना घेउन त्याने “कुंपण” नावाचा छोटा लघुपट प्रकाशित केला. आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या ‘कुंपणाआड’ बंदिस्त होतो या आशयाचा तो चित्रपट अनेक महोत्सवांत पोचला. त्या अनुभवाने अतुलला एकदम हुरूप आला आहे आणि त्या हुरुपात त्याने एक नाटक लिहून मित्रांच्या मदतीने बसवले आहे ‘Life Rewind’.
नाटकं व मराठी मंडळाचे व्यवहार चालू असताना “BMM इथे आणायचं का?” हा मुद्दा निघाला. “आणायचं म्हणजे काय? या  प्रश्नापासून माझी सुरुवात होती! “BMM-लॉस अँजेलिसच्या IT समितीवर त्यांची नेमणूक झाली. BMM Mobile App त्यांच्या चमूनेच तयार केले. सकारात्मक दृष्टिकोनामुळे लॉस अँजेलिस च्या BMM ने फक्त चांगले अनुभव पदरी टाकले, असं म्हणत त्यांनी एक खास आठवण सांगितली. IT समितीचे काम परिषद सुरू व्हायच्या आधी जोरदार चालते. एकदा परिषद सुरू झाली की थोडेसे स्वास्थ्य लाभते. “कमी तिथे आम्ही” या तत्वावर त्यांनी इतर आघाड्यांवर मदत करायला सुरुवात केली. भारतातून BMM साठी आलेल्या कलाकारांना बरेचदा स्थानिक व्यक्तीची जाण्यायेण्यासाठी, गावाची माहिती करून घेण्यासाठी मदत लागते. अश्या कलाकारांत एक कलाकार होता ‘राहुल सोलापूरकर’. त्याला लागल्यास मदत करायची जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्याच्या रुपात त्यांना एक आयुष्यभराचा मित्र लाभला. तीच गोष्ट ‘प्रमोद कांबळे’ या प्रतिभावान चित्रकाराची. BMMच्या सजावटीत त्याचा सिंहाचा वाटा होता.
BMM झालं, आता पुढे काय? नाटकाचे वेड स्वस्थ बसू देत नाही. असे एक नाटक वेडे संजीव कुवाडेकर!  त्यांना  इथे वाढत असलेल्या मराठी मुलांना मराठी संस्कृती व भाषा यांचा- या मातीत रुजणारा- परिचय व्हावा म्हणून नाट्यसंस्था काढावी अश्या विचारात ते आहेत. त्या कार्यात हातभार लागावा अशी त्यांची  इच्छा आहे.…
आणि तो संकल्प पुरा व्हावा अशी Team BMM -Detroit ची सदिच्छा आहे!