Shubhada Kamerkar

By April 22, 2016Uncategorized

 

shubhada-300x300शुभदा “शुबी” कामेरकर
          “टवाळा आवडे विनोद” असं संत रामदास नाराजीच्या सुरात म्हणाले असले तरी आपल्याला सर्वांना टवाळक्या करायला आवडतात! “फक्त आपण टवाळक्या करतो हे इतरांना कळलेले आपल्याला आवडत नाही…” हे बोलताना शुभदाताईंनी मारलेला डोळा मला फोनवरून देखील दिसला. २०११ साली डेट्रॉइटच्या रंगमंचावर पाहिलेला त्यांचा हसरा चेहरा लगेच माझ्या डोळ्यासमोर आला. ‘उभ्या उभ्या विनोद’ हा stand up comedyचा मराठी (“सोवळा”) अवतार. दिवाळीचं पावित्र्य, मराठी माणसाची मानसिकता आणि प्रसंगाचं औचित्य यांचं भान ठेवून शुभदा कामेरकर यांनी त्यांच्या चमूसह केलेले विनोद डेट्रॉइटकरांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते …
               शुभदाताई इथे आल्या त्या अनेकांप्रमाणे लग्न करून पस्तीसेक वर्षांपूर्वी. सासर कामेरकर – म्हणजे सुलभा देशपांडे या गुणी अभिनेत्रीचे माहेर. त्याचं घर म्हणजे नाटकं करावी लागणारच! (छोट्या छोट्या वाक्यातून मिश्कीलपणा जाणवत होता). मग लग्नकार्यात, घरगुती समारंभात त्यांनी “roasting” (सभ्य टवाळकी) करायला सुरुवात केली. ती अनेकांना आवडून त्यांना निव्वळ roasting साठी आमंत्रणं येऊ  लागली. ओळखीत कोणीतरी त्यांना म्हणालं , “अगं तू नवऱ्याचीच जास्त चेष्टा करतेस”. त्याला त्याचं उत्तर: Humor begins at home!
              त्यांचे शालेय शिक्षण बालमोहन मध्ये झाले. नाटकाची आवड तिथे रुजली आणि न्यू जर्सी मध्ये फोफावली. शुभदाताई – (“अगं,  काय हे अहो जाहो लावलं आहेस? मला सगळे ‘शुबी’ म्हणतात.”) – बरं तर, शुबी व्यवसायाने  microbiologist.  ‘प्रथिनं’ या विषयावर ड्यूपॉंट या रसायनांच्या कंपनीत संशोधन करायची. दिवसभर  ते तर संध्याकाळी नाटकं. न्यू जर्सीतील काही नाटकप्रेमी मंडळींनी ‘Theatrix’ नावाची  एक संस्था काढली आहे. त्या संस्थेतर्फे ‘Western Ghat’ हा लहान मुलं व मोठी माणसं यांनी एकत्र येऊन २००५ सालच्या BMM मध्ये  कार्यक्रम  केला , तो प्रचंड गाजला आणि त्यानंतर एकाहून एक दर्जेदार नाटकं व एकांकिका करण्याचा त्यांनी चंगच बांधला.
              होता होता संक्रांत, महाराष्ट्र दिन या निमित्ताने शुबीने उभ्या उभ्या विनोद सांगून प्रेक्षकांना रिझवायचा वसा घेतला. रंगमंच  नाही, नेपथ्य नाही, प्रकाश योजना नाही, फक्त ध्वनीप्रक्षेपक. आरंभीच्या काळात  पु.ल. देशपांडे, व पु काळे यांसारख्या दिग्गजांचा विनोद इतरांपर्यंत पोचवला. पण नंतर तिच्या लक्षात आलं की  ‘सुंदर खाशी सुबक ठेंगणी’ ही कल्पना असो वा ‘का हो प्राचीला गच्ची हे यमक जुळतं का ?’ हा एका मराठी पिढीत अजरामर झालेला किस्सा असो, इथल्या मराठी समाजात तो कालांतराने  समजेनासा होतो. विनोदाची धाटणी समाजाप्रमाणे बदलत जाते; ते वेळीच उमजून तिने स्वतःच्या आयुष्यातील किस्से सांगायला सुरुवात केली, आणि प्रेक्षकांना ही मात्रा लागू पडली.
            उभ्या उभ्या विनोद म्हणजे jokes सांगणं नव्हे, एकीकडे इथे जन्मून वाढलेली, दुसरीकडे अमेरिकेत येऊन चाळीसहून अधिक वर्षं झालेली आणि त्यात भर म्हणजे नव्याने अमेरिकेत येणारी तरुण मंडळी अश्या बारा गावच्या पिढ्यांना एकाच वेळी एकाच जागी खिळवून ठेवायचं हे कठीण काम ती लीलया करते (किंवा आम्हाला प्रेक्षकांतून बघताना असे वाटते). इतकंच काय तर BMM च्या महासमुदायापुढे सुद्धा  ह्यांचा चमू बोल बोल म्हणता सभागृह हास्यकल्लोळाने दणाणून सोडतो.
          BMM च्या अनुभवाचं तर गाठोडं तिच्या पाठीशी आहे! डेट्रॉइटकर पुढच्या वर्षीसाठी सज्ज होत असताना शुबीची सगळी निरीक्षणं मोलाची आहेत, मोजकेच कार्यक्रम आणि दोन कार्यक्रमांमध्ये पुरेसा वेळ ठेवा ही तिची कळकळीची विनंती आहे.
       आता  पुढचं उद्दिष्ट काय? विनोदयात्रा चालू राहिलच पण आयुष्यात आलेले वेगवेगळे अनुभव गुंफून संवाद साधायची तिची इच्छा आहे. त्यांच्या ‘कभी ख़ुशी कभी गम’ कार्यक्रमाची आम्ही आता आतुरतेने वाट पाहत आहोत!
शब्दांकन: ज्योत्स्ना माईणकर  दिवाडकर

Leave a Reply

Themes by www.themesfreedownloader.com

www.couponslay.com